राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना शिंदे सरकराने मोठा दिलासा दिला असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागानं हा निर्णय जाहीर केला आहे. जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रुपयांऐवजी आता 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 ऐवजी आता 27 हजार रुपये मिळणार आहेत.

बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी आता मिळणार 36 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारनं नुकसानीची मर्यादाही वाढवली आहे. दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार असल्याचं या शासन निर्णयात म्हटलं आहे.
जलवायु बदलामुळे ऋतुंमध्ये घडणाऱ्या बदलांमुळे सगळ्यात जास्त कुणाचे नुकसान झाले असेल तर ते शेतकऱ्यांचे आहे. सततच्या बदलणाऱ्या मौसमामुळे वेळी अवेळी पाऊस येतो, आणि कधी कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ येतो. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुसकान होते, आणि दरवर्षी अनेक शेतकरी या कारणास्तव आत्महत्या देखील करतात. असे असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे, ज्याचे चहुबाजूंनी स्वागत करण्यात येत आहे.
