पुणे : पुण्यात उद्यापासून सुरू हाेणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शरद पवार यांच्या गटाचा विराेध असूनही राष्ट्रवादीच्या माजी खासदाराने मात्र स्पर्धेला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबियांचे कुस्ती क्षेत्रात माेठे याेगदान असल्याने ही स्पर्धा आपाेआपच अधिकृत ठरली आहे. यंदाच्या वर्षी पुण्याचे माजी महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी स्पर्धेचे आयाेजन केले आहे.
कुस्तीगीर परिषदेची स्थापना मामासाहेब मोहोळ यांनी केली. त्यामुळे महाराष्ट्र केसरी किताबाची लढत जिंकणाऱ्या मल्लास मोहोळ कुटुंबीयांच्या वतीने चांदीची गदा प्रदान करण्यात येते. यावेळी या स्पर्धेस राज्य कुस्तीगीर परिषदेची मान्यता नाही, असे म्हटले जात आहे. शरद पवार गटाने स्पर्धा अनधिकृत असल्याचे म्हणत विराेध केला आहे. मात्र, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी खासदार अशोक मोहोळ यांनी म्हटले आहे की, ‘स्पर्धा होणार असल्याने आमच्या कुटुंबीयांच्या वतीने ही गदा विजेत्या मल्लाला देण्यात येईल. उद्या सकाळीच ही गदा आमच्यापर्यंत पोहोचणार असून, त्याचे विधीवत पूजन झाल्यावर ती स्पर्धा संयोजकांकडे सुपुर्द करण्यात येईल. या वेळी स्पर्धेचे आयोजन मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आले आहे. त्यामुळे मोहोळ कुटुंबीयांना मिळालेले आयोजन ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. म्हणूनच या वेळीही ही गदा विजेत्या मल्लास देण्यात येईल.
शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी मात्र कुस्ती स्पर्धेला मान्यता दिलेली नसल्याचे म्हटले आहे. लांडगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 10 ते 14 अखेर कोथरूड पुणे येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. स्पर्धा आयोजकांना कुस्तीगीर परिषदेने नियम, अटी व शर्तीसह पत्र दिले होते. आयोजकांनी परिषदेला या पत्राचे उत्तर दिलेले नाही. आयोजकांना परिषदेच्या नियम अटी मान्य नाहीत असे सिध्द होते. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला मान्यता दिलेली नाही.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेच्या मल्लाला मिळणाऱ्या चांदीच्या गदेला अत्यंत महत्व आहे. मामासाहेब माेहाेळ यांच्या कुटुंबियांनीच गदा देण्याची परंपरा कायम ठेवली जाणार असल्याचे म्हटल्याने स्पर्धा अधिकृत ठरणार आहे
