नगर : राज्यात काॅंग्रेसला माेठा धक्का देण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली असल्याची चर्चा आहे. विधान परिषद निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघात काॅंग्रेसच्या बड्या नेत्याच्या नातेवाईकाला उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. राहूल गांधी यांचा विश्वासू असलेला हा नेता लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचे बाेलले जात आहे. या नेत्याने राहूल गांधी यांच्या भारत जाेडाे यात्रेत महत्वाची भूमिका बजावली हाेती.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे उमेदवार अनेक ठिकाणी जाहीर झाले आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपने माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डाॅ. रणजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार देण्याची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाळले.
नाशिक पदवीधऱ मतदारसंघातून काॅंग्रेसचे डाॅ. सुधीर तांबे हे विद्यमान आमदार आहेत. काॅंग्रेसतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. पण त्यांनी अद्याप अर्ज भरलेला नाही. या जागेवर भाजपकडून विखे कुटुंबातील डाॅ. राजेंद्र विखे यांचे नाव चर्चेत होते. मात्र मतदार नोंदणी आणि इतर बाबींत सक्रिय नसल्याने ते रिंगणात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विखे कुटुंबातील इतर कोणाचे नाव भाजप जाहीर करणार का, याकडे अनेकांचे लक्ष आहे.
या मतदारसंघात काॅंग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत भाजप असल्याचे बाेलले जात आहे. काॅंग्रेसच्या एका बड्या नेत्याचा नातेवाईक असलेल्या युवा नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याची तयारी सुरू झाली आहे. या युवा नेत्याला भाजपने संधी दिली तर नगर जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
