एकीकडे शिवसेना पक्षासाठी आणि चिन्हासाठी लढाई सुरू असतांना ठाकरे गटासमोर आणखी एक मोठं आव्हान निर्माण झाले आहे. निवडणूक आयोगाची लढाई सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार आहे. याबाबतची माहीती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. अवघे बारा दिवस उरले असताना, आयोगात पक्षाचा संघटनात्मक पेच फसलेला असताना ठाकरे गटापुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे. 23 जानेवारी 2023 ला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षे पूर्ण होणार आहेत. पुन्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन संघटनात्मक निवडणुकांसाठी शिवसेनेची आयोगाला विनंती करणार आहे. 2018 मध्ये कार्यकारणीच्या बैठकीत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा निवड झाली होती. मात्र, मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान या मुद्यावर निवडणूक आयोगाचा कुठलाच प्रतिसाद नव्हता. आता पुढच्या सुनावणीमध्ये तरी दिलासा मिळणार का याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीनं निवडणूक होते. वर्षानुवर्षे ही निवडणूक होत आली आहे. १९६६ पासून शिवसेना रजिस्टर्ड पक्ष आहे. १९६६ नंतर सर्व निवडणूका शिवसेनेनं लढवल्या आहेत. १९८९ मध्ये निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळालं. लोकशाहीच्या मुल्याप्रमाणे निवडणूक झाल्या आहेत, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.लोकसभा आणि विधानसभेच्या दोन निवडणुका झाल्या तेव्हा का? कुणी बोलले नाही. घटणेप्रमाणेच उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख पदावर होते, आता त्यांचा कालावधी संपणार असल्याने संघटनात्मक निवडणुका घेऊ द्याव्यात याबाबत ठाकरे गटाकडून विनंती करण्यात आल्याचे अनिल देसाई म्हणाले आहे.
