मुंबई : महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या राजकारणानंतर आता मामा-भाच्याचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे. माजी महसूलमंत्री आणि काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थाेरात यांची त्यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी काेंडी केली आहे. तांबे यांनी काॅंग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी न घेता अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील डाॅ.सुधीर तांबे यांना काॅंग्रेसने अधिकृत एबी फाॅर्म दिला असतानाही त्यांनी भरलेला नाही.
राज्याच्या राजकारणात आतापर्यंत काका-पुतण्याचे राजकारण जनतेने पाहिले. शरद पवार यांच्यापासून ते गाेपीनाथ मुंडे, जयदत्त क्षीरसागर यांना पुतण्यांच्या राजकारणाने अडचणीत आणले. आता मामा-भाच्याचे राजकारण सुरू झाले आहे. सत्यजीत तांबे हे बाळासाहेब थाेरात यांच्या सख्या भगिनी दुर्गा तांबे यांचे पुत्र आहे. सत्यजीत यांचे वडील डाॅ. सुधीर तांबे नाशिकमधून विधानपरिषदेवर निवडून गेले हाेते. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारीही दिली हाेती. मात्र, त्यांनी खेळी करत पक्षाकडून अर्ज भरलाच नाही.
सत्यजीत तांबे मविआचे अपक्ष उमेदवार की भाजपचे हा प्रश्न विचारला जात आहे. भाजपाच्या या खेळीने की काॅंग्रेस अंतर्गत राजकारणाला पुन्हा एक राजकीय नवे वळण आले आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार असे म्हटले जात असले तरी सत्यजित तांबे यांना भाजपसुद्धा पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे बिनविरोध निवडले जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
