सुधीर तांबे यांनी पक्षाला फसवलं आहे. त्यामुळं नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे.काल झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला दिला आहे. याबाबतचा पुढील निर्णय हायकमांड घेईल. मात्र, काँग्रेस बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांनी सकाळी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षाला फसवलं असल्याचे नाना पटोले म्हणाले. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळं काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार नसल्याचे पटोले म्हणाले. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवरही टीका केली. बाळासाहेब थोरात आणि माझा काही संपर्क झाला नाही. भाजप सध्या घरं तोडण्याचा आनंद घेत आहे. पण ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल, तेव्हा त्यांना कळेल. त्यावर काही बोलायच नाही. पण पुढील कारवाई हायकमांडच्या निर्देशानंतर होईल, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.सत्यजीत तांबे यांना विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा पाठिंबा नसल्याचं स्पष्ट झाल्याने सत्यजीत यांचा मार्ग खडतर झाला आहे. मात्र त्याचवेळी सत्यजीत यांना भाजपचा पाठिंबा मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान सत्यजीत तांबे यांनी आपण अजुनही काँग्रेसमध्येच असल्याचं म्हटलं होतं. शिवाय आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असून सर्वांच्या भेटी घेणार असल्याचं नमूद केलं होतं. तसेच भाजपच्या नेत्यांना देखील विनंती करणार असल्याचं नमूद केलं होतं. तेव्हापासून सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली होती.यावेळी नाना पटोले यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं म्हटलं.
