महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : खेळाडूंच्या मानधनात तीन पटीने वाढ करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा.

पुणे : आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, या स्पर्धकांचा कौतुक करताना मानधनात तीन पटीने वाढवण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच यांना महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरी देणार असे ते म्हणाले. पुण्यातील स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२२-२३ च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा यावेळी प्रदान करण्यात आली.

अंतिम सामन्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार बृजभूषण सिंह, मंत्री चंद्रकांत पाटील, रामदास तडस उपस्थित आहे. त्यांनी महाराष्ट्र हिंद केसरीला १५ रुपये मानधन मिळणार तर ऑलिम्पिक कुस्ती पटून २० हजार रुपये मानधन मिळणार आहे.तसेच अर्जुन पुरस्कार विजेत्यांना केवळ ६ हजार रुपये मानधन मिळत ते आता २० हजार करण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार रुपये मानधन मिळतं ते आता साडे सात हजार रुपये करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

सामान्य घरचे लोक मेहनतीने कुस्तीगीर होतात. त्यांना सरकारकडून मदत मिळायला हवी. त्यासाठी मानधनवाढीचा निर्णय घेतला आहे. तीन खेळाडूंना आपण थेट डीवायएसपीची नोकरी दिली होती. अशी संधी खेळाडूंना देण्याचं काम निश्चितपणे करू असं याठिकाणी फडणवीस म्हणाले.

ज्याप्रकारे हे खेळाडू मैदानात कुस्ती करतात त्याच पद्धतीने आम्ही देखील राजकारणात कुस्ती खेळतो. पण आमची कुस्ती टीव्ही च्या स्क्रीनवर चालते. पण या टीव्ही स्क्रीनवरची कुस्तीमधूनही राजकारणात एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो, हे आपण बघितलंच, असे प्रतिपादन त्यांनी केले. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून दिल्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिकसाठी मागे पडतोय का? अशी शंका त्यांनी यावेळी निर्माण केली. त्यामुळे “महाराष्ट्र मिशन ऑलिम्पिक ” सुरु करणार असून पुढील ऑलिम्पिकमधील कुस्तीवीर हा महाराष्ट्रामधील असेल”, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

आजच्या कुस्ती स्पर्धेत प्रेक्षकांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रेक्षक देशी खेळांचा मान वाढवत आहे. त्यामुळे पुढे महिलांसाठीही कुस्ती स्पर्धा भरवली जाईल.