हसन मुश्रीफ यांचे जावयासाठी जयोस्तुते! ग्रामपंचायतींच्या टेंडरचीही चाैकशी

मुंबई : माजी मंत्री हसन मुश्रीफ साखर कारखान्याच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात अडकले असतानाच त्यांच्या जावयाच्या कंपनीला मिळालेल्या ग्रामपंचायतीच्या टेंडरचीही चाैकशी करण्याची मागणी किरीट साेमय्या यांनी केली आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या समाेरील अडचणी वाढणार आहेत.

काेल्हापूर भेटीत माध्यमांशी बाेलताना साेमय्या म्हणाले, मुश्रीफ यांनी आपल्या जावयासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीवर जिझिया कर लावला. प्रत्येक ग्रामपंचायतीने ५० हजार रुपये जावयाच्या कंपनीला देण्याचा आदेश मुश्रीफांनी काढला. त्यामुळे दरवर्षी १५० कोटी रुपयांचा भुर्दंड सरकारला बसणार होता. आम्ही हा घोटाळा समोर आल्यावर कंत्राट रद्द करण्यात आलं. पण, याची संपूर्ण चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वचन दिलं आहे. हुंडा म्हणून हसन मुश्रीफांनी जावयाला प्रत्येक वर्षी १५० कोटी रुपये दिले.

हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांच्याशी संबंधित जयोस्तुते प्रा.लि.कंपनीला राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदांचे रिटर्न्स भरण्यासाठी देण्यात आलेल्या १५०० कोटींच्या कंत्राटात झालेल्या घोटाळ्याची चौकशी लोकायुक्तांकडून सुरू करण्यात आल्याचे साेमय्या यांनी म्हटले आहे.