शरद पवार यांनी कान टाेचूनही काॅंग्रेस सुधरेना

मुंबई : काॅंग्रेसमध्ये तरुण नेतृत्वाला संधी नसल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांना काॅंग्रेसमधून निलंबित करण्याचे आदेश दिल्लीतून आले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात काॅंग्रेसचे कान टाेचले हाेते. नाशिकचा वाद चर्चेने मिटवता आला असता, अजूनही वेळ गेलेली नसल्याचे म्हटले हाेते.

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांच्या नावाने एबी फाॅर्म आला हाेता. मात्र, सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यामुळे काॅंग्रेसमध्ये चडफड वाढली आहे. पक्षांतर्गत वादात बाळासाहेब थाेरात यांच्यावर हल्ला करण्याची संधीच पाहत असलेल्या नाना पटाेले, अशाेक चव्हाण यांनी चर्चेची भूमिकाच घेतली नाही. दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी आगीत तेल ओतले. बाळासाहेब थाेरात यांना आपण कल्पना दिली हाेती. मात्र, त्यांनी दूर्लक्ष केले असे ते म्हणाले.

मुळात हे सगळे प्रकरण काॅंग्रेस तसेच महाविकास आघाडीने अत्यंत चुकीच्या पध्दतीने हाताळले. काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी पहिल्याच दिवसापासून थाेरात यांच्यावर बंदुक राेखली. काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून तांबे पिता-पुत्रावर प्रहार केले जाऊ लागले. कालच सुधीर तांबे  यांना तात्पुरते निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. हे निलंबन तात्पुरते आहे असे म्हटले जात असले तरी सत्यजित तांबे यांना निलंबित करून काॅंग्रेसने ते कायमस्वरुपी ठेवले आहे.
राज्यातील आणि देशातही काॅंग्रेस तरुण नेतृत्वाला संधी देण्यास तयार नसते. मध्य प्रदेशात कमलनाथ आणि ज्याेतिरादित्य शिंदे यांच्या वादात शिंदे यांना शेवटी पक्ष साेडावा लागला. राजस्थानातही अशाेक गेहलाेत यांच्यासाेबतच्या वादात सचिन पायलट कधीही पक्षाबाहेर जाऊ शकतात. आता सत्यजित तांबे यांनाही निलंबित केल्यावर त्यांना पक्षाबाहेर जाण्याशिवाय पर्याय नाही.

काॅंग्रेस नेतृत्वाची खरी मळमळ ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांची स्तुतीत केली ही आहे. तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात फडणवीस म्हणाले हाेते,सत्यजित तांबे यांना मी अनेक वर्षांपासून बघत आहे. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये जे वेगळेपण असते, ते सत्यजित मध्ये पाहायला मिळत. बाळासाहेब थोरात तुमच्याकडे एक तक्रार आहे. सत्यजित सारखे नेते, तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात. सत्यजितला जास्त दिवस बाहेर ठेऊ नका, नाहीतर आमची नजर त्यांच्यावर आहे. कारण, चांगली माणसं जमाच करायची असतात.

वास्तविक महाराष्ट्रातील राजकारण हे सुसंस्कृत मानले जाते. त्यामुळे फडणवीस यांनी तांबे यांची स्तुती केल्याने काॅंग्रेसच्या नेत्यांना बरेच वाटायला हवे होते. मात्र, त्याचा गैरअर्थ काढण्यात आला. आता मात्र सत्यजित तांबे यांना काॅंग्रेसशिवाय दुसरा पर्याय स्वीकारण्याशिवाय मार्ग नाही. एका अर्थाने काॅंग्रेस नेतृत्वानेच त्यांना बाहेर ढकलले आहे. मात्र, त्यामुळे राज्यातील युवकांना काॅंग्रेससाेबत गेल्यास काय हाेते याचा धडाही मिळाला आहे.