नाशिक विधान परिषद मतदासंघात सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीबाबत झालेल्या घाेळाला नाना पटाेले जबाबदार असल्याचा हल्लाबाेल काॅंग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गें यांना पत्र लिहून ‘पक्षातली बेबंदशाही न संपल्यास राज्यात काँग्रेस नव्याने आलेल्या शिंदे गटाच्याही मागे पडून पाचव्या नंबरला जाईल अशी भीती व्यक्त करत महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे.खर्गे यांना लिहिलेल्या पत्राचा विषयच त्यांनी महाराष्ट्रातील कॉग्रेसची परिस्थिती चिंताजनक.प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज, असा लिहिला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कॉग्रेस पक्ष इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा मागे पडला आहे.आपला पक्ष महाराष्ट्रात सकारात्मक कार्य करतांना दिसत नाही, ही वस्तूस्थिती आहे. शेतकरी, कामगार, आदिवासी युवा वर्ग, महिला, शोषित, पिडीत, वंचित, मागासवर्गीय यांचे प्रश्न व्यवस्थित हाताळण्यासाठी तसेच संघटनात्मक कार्य करून ओबीसी व महिलांवरील अत्याचार आणि जनहितार्थ मुद्द्यांवर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये नाना पटोले यांना मोठ्या विश्वासाने कॉंग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली. पण तो विश्वास त्यांनी सपशेल फोल ठरवला. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यशिलीमुळे हा बालेकिल्ला आता काँग्रेसच्या हातातून निसटला आहे हे सर्वश्रुत आहे.
सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीने काँग्रेसची नामुष्की झाली यात प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉग्रेसची दाणादाण उडत आहे. डिसेंबर २०२१ मध्ये विधान परिषदेसाठी नागपूरच्या जागेवरून कॉग्रेस उमेदवार रवींद्र भोयर होते. पण मतदानाच्या काही तास आधी नाट्यमय घडामोडी झाल्या. अचानक अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या बावनकुळे यांचा जबरदस्त विजय झाला. जून २०२२ मध्ये विधान परिषद निवडणूकीत चंद्रकांत हांडोरे हे नंबर एक चे उमेदवार होते. पण भाई जगताप यांना जास्त मते मिळाली त्यामुळे चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. हांडोरे यांना निवडून आणण्याचे हायकमांडचे आदेश होते. तरीही या आदेशाच्या विरोधात निकाल लागला. ४ जुलै २०२२ ला शिंदे – फडणवीस सरकारची बहुमत चाचणी परीक्षा होती. यावेळी विरोधकांची एकजूट महत्वाची होती. पण कॉग्रेसचे तब्बल १० आमदार या बहुमत चाचणीत गैरहजर राहिले. यामुळे सरकारचे बहुमत मोठ्या प्रमाणात वाढले. पक्षादेश असतांना सुद्धा अनेकांनी पक्ष विरोधी काम केलं. या तीनही प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. त्यासाठी हायकमांडकडे अहवाल पाठवणार असल्याचे दावे त्यांनी केले. पण आजपर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही किंवा कोणालाही जबाबदार ठरविण्यात आले नाही.
