हसन मुश्रीफांच्या जावयाला हुंडा म्हणून ग्रामपंचायतेतून कर; किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अनेक कंपन्या आणि कार्यालयावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. रजत कंजुमर आणि माऊंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या खात्यावरून ४९ कोटी ८५ लाख रुपये मुश्रीफ कुटुंबाच्या खात्यावर आले. त्यावर मुश्रीफ काही बोलत नाहीत असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ग्रामविकास मंत्री असताना मुश्रीफ यांनी रद्द केलेल्या आदेशाचा तपास होणार असल्याचे सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्या म्हणाले की, ‘आपल्या जावयासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीवर जिझीया कर आला. प्रत्येक ग्रामपंचायतीने ५० हजार जावयाच्या कंपनीला देण्याचा आदेश मुश्रीफांनी काढला. त्यामुळे १५० कोटी रूपयांचा भूर्दंड सरकारला बसणार होता. आम्ही हा घोटाळा समोर आणल्यावर हे कंत्राट रद्द करण्यात आले. पण, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हुंडा म्हणुन हसन मुश्रीफांनी जावयाला १५० कोटी रूपये दिले आहेत.’ असा आरोप यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे.

शरद पवार यांच्यामध्ये हिंमत असेल, तर मुश्रीफ यांच्या वक्तव्याला समर्थन द्यावे. मुस्लीम नेत्यांना टार्गेट केलं जातं असं पवार यांनी म्हणावं. उद्धव ठाकरे यांनी म्हणावे हे मान्य आहे का? भ्रष्टाचार करताना जात आठवली नाही का? दोन्ही हातात हिरवा झेंडा घेतलेल्या उद्धव ठाकरे यांनी देखील भूमिका जाहीर करावं.

मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळ्याबाबत बोलताना सोमय्या म्हणाले की, ‘मुंबई महापालिकेत कोविड घोटाळा झाला. तत्कालिन सत्ताधारी नेत्यांसाठी कोविड हे कमाईचे साधन होते. खासदार संजय राऊत यांचे सहकारी सुजित पाटकर यांनी लाईफलाईन रूग्णालय सर्विसेसला १०० कोटी रूपयांचे कंत्राट मिळाले. ही कंपनी कधीच अस्तित्वात नव्हती. तसेच, त्यांना रुग्णालय चालवण्याचा कोणाताच अनुभव नाही. मग, या कंपनीला १०० कोटी रुपयांचं कंत्राट कसं दिलं. या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनेक करोना रुग्णांचा मृत्यू झाला.