मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परळी कोर्टाने राज ठाकरे यांचं अटक वॉरंट रद्द केलं आहे. राज ठाकरे यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कोर्टात सुनावली झाली होती. दोन सुनावणीवेळी राज ठाकरे कोर्टात उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्यामुळे राज ठाकरे आज कोर्टात हजर राहिले. यावेळी राज यांच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादानंतर राज यांचं अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे.
यासोबतच त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. प्रत्यक्ष हजर राहिल्यानंतर त्यांनी आपल्याविरुद्धचं वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. त्यानंतर कोर्टाने दंड ठोठावून त्यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट रद्द केलं आहे. अवघ्या पाच ते सात मिनिटांत ही प्रक्रिया पार पडली.
चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यासाठी राज ठाकरे परळीत दाखल झाले होते. परळी कोर्टात झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट रद्द झालं. तसंच त्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे राज यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
