दाओसमध्ये पहिल्याच दिवशी राज्याला मिळाली 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक

महाराष्ट्रासाठी अत्यंत सुखद मंगळवार ठरावा, अशी सकारात्मक बातमी आहे. विशेषतः तरुणांसाठी आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांकरिता आशादायी वृत्त आहे. स्वित्झर्लंड येथील डाव्होस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 45,900 कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या डाव्होस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सुमारे 10 हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. दाओस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले आहे. त्यांनी दाओस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिल्याचे सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. तसेच महत्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करारही केले जाणार जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते. आजपासून दावोस परिषदेला सुरूवात झाली. जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम महत्त्वाची मानली जाते. या परिषदेत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात येतात.