संजय राऊत पळून नेमकं कोण गेलं?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमीच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी व आपण पक्षासाठी किती काम करतोय दाखवण्यासाठी वारंवार प्रयत्न करतात हे करताना आपण काय बोलतोय कुणाबद्दल बोलतोय आणि कसं बोलतोय याचा जरा सुद्धा भान त्यांना राहत नाही किंवा ते भान ठेवत नाहीत असंच त्यांच्या बोलण्यातून नेहमी दिसून येतं.

       असच विधान त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं, कोरोना काळात डॉक्टर व नर्सेस पळून जात होते. त्यांना आम्हाला जुंपण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केलं असं ते म्हणाले. आता हे वक्तव्य करताना संजय राऊत नेमकं कोणत्या धुंदीत होते, असाच प्रश्न डॉक्टर नर्सेस त्याचबरोबर वार्ड बॉय, ब्रदर्स, वैद्यकीय क्षेत्रात काम करत असलेली लोक विचारत असतील हे वक्तव्य करून त्यांनी या कर्मचाऱ्यांचा अपमान केलाय हे मात्र नक्की. महाराष्ट्रात किंवा भारतात यापूर्वी अशी महामारी कधी आली नव्हती. त्याबद्दलचे औषध गोळ्या व काय उपचार आहेत हे देखील डॉक्टरांना माहीत नव्हतं असं असताना देखील देशातील असो किंवा राज्यातील डॉक्टरांनी त्याचबरोबर त्यांच्यासोबत काम करणारे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र एक करून आपल्या कुटुंबापासून दूर राहून या कोरोना रुग्णांची सेवा केली.

    संजय राऊत म्हणतात की, डॉक्टर व नर्सेस पळून जात होते त्यांना कामाला जुंपण्यात आले, संजय राऊत यांनी हे लक्षात घ्यावे की, कामाला जुंपण्याची भाषा त्यांनी वापरली मात्र, अशी भाषा वापरण्यासाठी ते काही बैल किंवा गाय नाहीत. कोरोना काळात कुठे होते हा प्रश्न देखील उपस्थित होतो. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून होते. त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिलं होतं. अशावेळी ते फक्त फेसबुकवरच जनतेला दिसत होते. अशावेळी याच डॉक्टर नर्सेसनी कोरोना रुग्णांची काळजी घेतली त्यावेळी मुख्यमंत्री फक्त सामनाला मुलाखत देताना दिसत होते व त्यांची मुलाखत संजय राऊत हे घेत होते. त्यावेळी संजय राऊत म्हणाली की, डब्ल्यूएचओ तुमच्याकडून सल्ला घेतो व डॉक्टर पेक्षा जास्त ज्ञान तुमच्याकडे आहे हे जनतेने देखील नक्कीच विनोद म्हणून घेतलं असेल. घरात बसून फक्त सल्ले देण्याचे काम त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं त्यामुळे संजय राऊत यांनी स्पष्ट करावं की नेमकं पळून कोण गेलं.