मुंबई महापालिकेतील मुदतठेवी वरून उध्दव ठाकरे यांच्या पेन्शनर वृत्तीवर पंतप्रधानांचा हल्लाबाेल

मुंबई : सुमारे नव्वद हजार काेटी रुपयांच्या मुदतठेवी बॅंकांमध्ये असताना मुंबईकरांना पायाभूत सुविधा न देणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या पेन्शनर वृत्तीवर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी हल्लाबाेल केला. पैसे केवळ बँकात खितपत पडणार असेल तर मुंबईचा विकास कसा होईल असा सवाल पंतप्रधानांनी केला.

देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी 90 हजार कोटींवर गेल्या आहेत. ही रक्कम विविध बँकांमध्ये मुदत ठेवी स्वरूपात ठेवण्यात आली आहे. पालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदतठेवी विविध बँकांमध्ये आहेत. मुंबई महापालिकेची मुख्य ८५ टक्के कमाई बांधकाम क्षेत्रातून आहे.

जीएसटी कॉम्पेन्सेशन, मालमत्ता कर, पाणीपट्टी, विकासकामांना वाढवून दिला जाणारा एफएसआय आणि गुंतवणुकीतून मिळणारे व्याज हे बीएमसीच्या उत्पन्नाचे अन्य स्रोत आहेत. बीएमसीकडे इतका प्रचंड पैसा असूनही या महानगराला आवश्यक त्या पायाभूत सुविधा मिळत नाहीत. हजाराे काेटी रुपयांच्या मुदतठेवी बॅंकांमध्ये असताना नागरिकांना सुविधा दिल्या जात नाही. पंतप्रधान माेदींनी  मुंबई महापालिकेच्या ठेवी पेन्शनरप्रमाणे जपून ठेवणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.