विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने बुधवारी घेतला होता. यासंदर्भातील अधिकृत घोषणा आज महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत झाली. काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाहीच, हे आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये, महाविकास आघाडीकडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. तर, सत्यजीत तांबेंवर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. 6 वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली असतानाही त्यांनी पक्षाशी बेईमानी करत अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला व नागपूरमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना मविआचा पाठिंबा आहे, असं नाना पटोले म्हणाले. सत्यजीत तांबेंचं मौन दरम्यान सत्यजीत तांबे यांना महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याबाबत विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, पण त्यांचा प्रचार मात्र सुरू आहे. सत्यजीत तांबे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणी राहुरी तालुक्यातील शिक्षणसंस्था आणी शिक्षकांसह पदवीधरांच्या भेटीगाठी घेत आहेत.
