मुंबई : आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलेले आहे. याआधी अनेक लोकांनी त्यांच्यासोबत युती केलेली आहे. पण उद्धव ठाकरेंनी युती केलेल्या लोकांना कोणत्या ठिकाणी ठेवले, हेदेखील पाहिलेले आहे. प्रकाश आंबेडकर ते सहन करणार नाहीत. ते एक आक्रमक नेते आहेत. म्हणूनच ही युती टिकाणार नाही, असे मत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीवर बाेलताना शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत मनापासून युती झालेली नाही. मी प्रकाश आंबेडकर साहेबांना पाहिलेले आहे. खंबीर नेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. व्ही.पी सिंह जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते ‘प्रकाशजी कहाँ हैं, मुझे उनके साथ खाना खाना हैं,’ असे म्हणाले होते. प्रकाश आंबेडकर त्या पातळीचे नेते आहेत. आज ते उद्धव ठाकरेंसोबत गेले आहेत. यामागचे कारण त्यांनाच माहिती आहे. ही युती टिकणार नाही, असे मला मनापासून वाटत आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कामापुरती युती केली आहे.
