चिंता मोदींची नको तर पवार व आपल्या पक्षाची करा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आजकाल कोणीही टीका करत आहे. त्याचं कारण असं की या सगळ्यांना असं वाटत कि आपली लढाई ही भाजप सोबत नसून नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहे. कोणत्याही निवडणुकांमध्ये आपली लढाई ही समोरच्या उमेदवारासोबत नसून ती थेट नरेंद्र मोदी यांच्या सोबतच आहे असं विरोधी पक्षातील नेत्यांना वाटतं सध्या निवडणुका नरेंद्र मोदी आणि अन्य अशी आहे. अशी सगळी स्थिती असल्याने विरोधकांच्या मनातील राग दिसत आहे या मुळे कोणत्याही विषयात नरेंद्र मोदी यांचं नाव घ्यायचं किंवा त्यांच्यावर भाष्य करण्याची सवयच इतर पक्षातील नेत्यांना झाली आहे.

      या आधी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणायचे कि शरद पवार यांच्यावर टीका ही प्रसिद्धी साठी केली जाते पण तस काही नव्हतं परंतु नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून किंवा त्यांना विरोध करून अनेक छोटे-मोठे नेते प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करताना आपण पाहिले अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या कि, राज्यात किंवा देशात कुठलीही निवडणूक असली कि मोदींनाच प्रचार करावा लागत आहे. त्यामुळे मला त्यांची चिंता वाटत आहे. सुप्रिया सुळे यांना नक्की चिंता कशाची वाटत आहे. नरेंद्र मोदींच्या प्रचाराची कि त्यांनी प्रचार केला कि ती निवडणूक ते म्हणजे भाजप जिंकतेचं या गोष्टीची आणि असं असलं तर त्यात मोदींची चिंता वाटण्यासारखं काय आहे? याची चिंता करायची असेल तर भाजप किंवा स्वतः नरेंद्र मोदी करतील. प्रत्येक पक्षात असे नेते असतात जे पक्ष वाढीसाठी फिरतात जसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील फिरतात व शरद पवार हे या वयातही फिरतात ते अधिक महत्वाचं त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांची चिंता करावी.

        काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे अधिवेशन होते. त्यावेळी पक्षातील सर्व महत्वाचे नेते व कार्यकर्ते तिथे जमले होते.त्याच वेळी शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याने मुंबई येथे उपचार घेत होते. त्यावेळी पक्षातील काही नेते नाराज असल्याचे त्यांना समजले व ते थेट शिर्डी येथे दाखल झाले कारण आधीच राष्ट्रवादी मध्ये अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे. पक्ष आपल्या अस्तित्वासाठी लढताना आपण पाहत आहोत अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या कडे दुसरा कोणता नेता नसल्याने त्यांना त्या ठिकाणी जाणे गरजेचे होते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांची चिंता करावी. नरेंद्र मोदी हे स्वतःच्या प्रयत्नांनी यश मिळवतात कदाचित परत एकदा ते पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचीच निवड होईल. एवढं प्रचंड यश मिळवणाऱ्या व्यक्तीची चिंता सुप्रिया सुळे यांनी करू नये चिंता करायचीच असेल तर शरद पवार व आपल्या पक्षाची चिंता करावी.