मुंबई : शिवसेना आणि ठाकरे परिवार कधीही पडती भूमिका घेत नाहीत, असे महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिले आहे. भाजपसाेबत युतीच्या वेळी अगदी प्रमाेद महाजनांपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते माताेश्रीवर ठाकरेंना भेटायला जायचे. मात्र, शिवसेनेतील फुटीमुळे आलेल्या हतबलतेमुळे अगदी युतीच्या घाेषणेपासूनच पडती भूमिका घ्यायची वेळ उध्दव ठाकरे यांच्यावर आली आहे.
शिवसेना आणि वंचित बहुजन विकास आघाडीच्या युतीची घाेषणा आज झाली. यासाठी पत्रकार परिषदेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या पत्रकार परिषदेला पत्रकार पाेहाेचले आणि त्यांना धक्काच बसला. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना संयुक्त परिषद असे बॅनर मागे लावण्यात आले हाेते. मात्र, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी वर आणि शिवसेना खाली हाेती. दाेन पक्षांमध्ये युती हाेते त्यावेळी माेठ्या पक्षाचे नाव वरच्या बाजुला असते. किमान दाेन्ही पक्षांची नावे एका रेषेत तरी लिहिलेली असतात. त्यामुळे वंचितबराेबरच्या युतीची हतबलताच या बॅनरमधून दिसत आहे, असे म्हटले जात आहे.
शिवसेना कव्हर करणारे पत्रकार सांगतात की, आजपर्यंत शिवसेनेने इतकी पडती भूमिका घेतल्याचे कधी पाहिले नव्हते. शिवसेनेच्या नेत्यांची बाॅडी लॅंग्वेजही ही युती आपल्यासाठी किती गरजेची आहे हे दर्शविणारीच हाेती. भारतीय जनता पक्षाने शिवसेना प्रादेशिक पक्ष असला तरी कायमच बराेबरीचे स्थान दिले हाेते. बाळासाहेब ठाकरे तर पक्षाच्या स्थानाबाबत अत्यंत जागरुक असायचे. कितीही माेठा नेता असला तरी बाळासाहेब ठाकरेच काेणत्याही साेहळ्याचे प्रमुख असायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी शिवसेनेची ही पडती भूमिका पाहणे वेदनादायी आहे. वंचित बहुजन आघाडीची ताकदही मर्यादित आहे.
