शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहे. दौऱ्यात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत त्यांची बैठक होणार आहे. राज्यातील विकास कामांबाबतही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
तसेच मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्नही मार्गी लागण्याची चिन्ह आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये येऊन गेले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीला पोहोचले आहे. त्यामुळे या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, चर्चांना उधान आले आहे. दरम्यान शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर 19 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. पण, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. शिवसेनेचे पक्षचिन्ह कुणाला मिळणार याचा फैसला अजून निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयामध्येही सुनावणी सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्याच्या सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
