‘गांधी गोडसे: एक युद्ध’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका चित्रपटगृहात चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान गोंधळ झाला होता. आता तर चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करून सुरक्षेची मागणी केली.
विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांना लिहिलेल्या पत्रात राजकुमार संतोषी यांनी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर अतिरिक्त सुरक्षेची विनंती केली. याबाबतची तक्रार राजकुमार संतोषी यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण यांच्याकडे केली असून पोलिसांना पत्रही लिहिले आहे. पत्रात राजकुमार संतोषी यांनी सांगितले की, त्यांनी २० जानेवारीला चित्रपटाच्या टीमसोबत पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुंबईतील अंधेरी परिसरात ही पत्रकार परिषद सुरू होती, असे संतोषी यांनी सांगितले. त्यानंतर एका गटाने तेथे येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे चित्रपटाच्या टीमला पत्रकार परिषद मध्येच थांबवावी लागली.
राजकुमार संतोषी यांनी सांगितले की, नंतर त्यांना त्यांच्या चित्रपटाचे प्रदर्शन आणि प्रमोशन थांबवण्याची धमकी देण्यात आली, अन्यथा ते चांगले होणार नाही. राजकुमार संतोषी म्हणाले की,माझ्या आणि माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या सुरक्षेसाठी मला ताबडतोब अतिरिक्त सुरक्षा पुरवावी, अशी मी तुम्हाला विनंती करतो. अशा लोकांना मोकळे सोडले आणि त्यांच्यावर कारवाई केली नाही तर माझे मोठे नुकसान होऊ शकते.चित्रपटात महात्मा गांधींचा अवमान करण्यात आला आहे, तर त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांचा गौरव करण्यात आला आहे, असे विरोध करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे.
