शाळेतील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी केला प्रचार

शाळा – महाविद्यालये ही पवित्र ठिकाणे आहेत राजकारणापासून दूर ठेवायला हवीत असा संकेत आहे. मात्र बारामती लाेकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका शाळेतच मुलांशी बाेलताना तुमच्या आई – वडिलांना मला मतदान करायला लावा असे सांगत प्रचार केला.पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथील पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत संविधान कट्याचे उद‌्घाटन झाले. यावेळी बाेलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या तुमचे शिक्षक जसे येथे काम करतात तशी मी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे नाेकरी करते.

त्याचबराेबर तुमची खासदार म्हणूनही काम करते. तुमच्यापैकी किती जणांनी घरून निघताना आई – वडिलांना मला मतदान केले आहे का विचारले आहे? आता जरी विचारले नसेल तरी घरी जाऊन सांगा की 2024 च्या लाेकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनाच मतदान करा.सुळे यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाच्या महिला माेर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी हल्लाबाेल केला आहे. काय वेळ आलीये? ज्ञानार्जन करणाऱ्या निरागस चिमुड्यांना आपल्या आई-वडिलांना मला मतदान करा हे सांगायची वेळ ताईंवर आलीये? याच ताईंना दोनच दिवसांपूर्वी मोदीजींची काळजी वाटत होती. खरी वेळ स्वतःची काळजी करण्याची आली आहे.