मुंबई : विधान परिषदेत शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त आमदार हाेण्याचे स्वप्न भंग पावल्यावर अभिनेत्री ऊर्मिला माताेंडकर भारत जाेडाे यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा काॅंग्रेसच्या वळचणीला गेल्या आहेत. जम्मू येथे राहूल गांधी यांच्यासमवेत त्या यात्रेत सहभागी झाल्या हाेत्या. लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून ऊर्मिला माताेंडकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली हाेती. पक्षातंर्गत राजकारणाला कंटाळून हा निर्णय घेत आहाेत. मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पक्ष लिहून संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु, काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण हे नित्याचे आहे. वेळोवेळी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत कल्पना देऊनही संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. यामुळे काॅंग्रेस साेडत असल्याचे त्यांनी सांगितले हाेते.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना ऊर्मिला माताेंडकर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदारकीची संधी देण्याचे निश्चित झाले हाेते. मात्र, राज्यपालांनी ही यादीच मंजूर केली नाही. आमदारकीचे स्वप्न पूर्ण हाेत नाही पाहिल्यावर त्यांनी पुन्हा काॅंग्रेसशी जवळीक साधण्यास सुरूवात केली आहे.
