नवी दिल्ली : विदर्भातील झाडीपट्टी कलेचा गाैरव करत प्रसिध्द झाडीपट्टी रंगकर्मी डाॅ. परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्काराची घाेषणा झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात एकमेव पद्मविभूषण असून २५ पद्मश्री आहेत.
मागील पन्नास वर्षापासून झाडीपट्टी रंगभूमीच्या माध्यमातून जनप्रबोधन करणारे रंगकर्मी म्हणून डॉ. परशुराम खुणे यांना ओळखलं जातं. ५ हजारहून अधिक नाटकांमध्ये ८०० पेक्षा अधिक भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. यासोबतच नक्षलवादी प्रभावातल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केलं आहे. डॉ. खुणे १५ वर्षे गुरनुलीचे सरपंच व ५ वर्षे उपसरपंच होते. १० वर्षांपासून झाडीपट्टी कला मंचचे ते अध्यक्ष असून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यही करीत आहेत.त्यांना १९९१ ला महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार, १९९२ ला जादूगार सुनील भवसार स्मृती पुरस्कार, १९९५ ला श्यामराव बापू प्रतिष्ठानच्या कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. खुणे यांच्या सिंहाचा छावा, स्वर्गावर स्वारी, लग्नाची बेडी, एकच प्याला, मरीमायचा भुत्या, लावणी भुलली अभंगाला, मी बायको तुझ्या नवऱ्याची, एक नार तीन बेजार, बायको का मातून गेली? नाथ हा माझा, इत्यादी नाटकातील भूमिका अत्यंत गाजल्या.
