देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच एक खूप मोठा आणि गौरवाचा दिवस आहे. दरवर्षी राजपथ म्हणजेच आताच्या कर्तव्यपथावर राष्ट्राचा प्रजासत्ताक दिवस अतिशय दिमाखात साजरा केला जातो. आणि त्यामध्ये दरवर्षी प्रत्येक राज्याचा गौरव करणारा एक चित्ररथ देखील असतो. हे वर्ष महाराष्ट्रासाठी अत्यंत खास असं वर्ष आहे, कारण यावर्षी कर्तव्यपथावर महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथात महाराष्ट्राच्या साढेतीन शक्तीपीठांचे आणि नारीशक्तीचे दर्शन घडविण्यात आले. अतिशय सुरेख असा हा चित्ररथ आणि गोंधळाचे गीत, अशा या वातावरणात आज कर्तव्यपथावर महाराष्ट्र राज्याचा गौरव करण्यात आला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीटरच्या माध्यमातून या चित्ररथाचा व्हिडियो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“अंबाबाई कोल्हापुरी,
असे रेणुका माहुरी,
सप्तशृंगी वणीमध्ये,
भवानी तुळजापुरी!
आदिमाया विद्या, शक्ती,
विश्वचैतन्याची होई,
तिच्यापासून उत्पत्ती!
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांची महती प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय संचलनामध्ये आज नवी दिल्लीत अवतरली.”
असे त्यांनी म्हटले आहे. एकूणच आज कर्तव्यपथावर भारतीयांच्या आणि हिंदु समाजाच्या भावनांचा आदर करणारे अनेक चित्ररथ दिसले. यामध्ये महाराष्ट्राच्या रथासोबतच जम्मू काश्मीरचा रथ ज्यामध्ये ‘अमरनाथ बाबा’ यांचे दर्शन घडले, हरियाणाच्या रथात कुरुक्षेत्र आणि कृष्ण अर्जुन संवादाचे दर्शन घडले, उत्तरप्रदेशाच्या रथात प्रभू श्रीराम आणि अयोध्येचे दर्शन घडले, तर झारखंडच्या रथात बाबा बैजनाथ धामचे दर्शन घडले.
आजचा हा सोहळा महाराष्ट्राच्या, स्त्रीशक्तीचा आणि अखंड हिंदु समाजाचा गौरव करणारा सोहळा होता.
