इंदिरा गांधी यांनी तर बीबीसीला भारतातून हाकलून दिले हाेते

नवी दिल्ली : गुजरातमधील 2002 च्या दंगलींबाबत अत्यंत विपर्यस्त आणि तथ्यहिन चित्रण असलेल्या बीबीसीच्या डाॅक्युमेंटरीवर सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे काॅंग्रेसमधील अनेकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुळका आला आहे. मात्र, 1970 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बीबीसीला भारतातून हाकलून देत दिल्लीतील कार्यालयाला टाळे लावले होते.

बीबीसीवरील माहितीपटास बंदी घातल्यानंतर काॅंग्रेसमधील नेते सरकारवर टीका करत आहेत. बीबीसीच्या वस्तुनिष्ठतेचे दाखले देत आहेत. दडपशाहीचा आरोप करत आहेत. परंतु, इंदिरा गांधी यांनी बीबीसीवर पूर्वग्रहदूषित ठरवत कारवाई केली हाेती याचा त्यांना विसर पडलेला दिसत आहे. 1970 च्या दशकात इंदिरा गांधींनी बीबीसीवर दोन वर्षांसाठी बंदी घातली. याचे कारण म्हणजे बीबीसीने  प्रख्यात फ्रेंच दिग्दर्शक लुई माल्ले यांची एक डॉक्युमेंटरी फिल्म प्रसारित केली हाेती.  

1968 आणि 1969 दरम्यान काेलकत्ता शहरातील वास्तव चित्रण यामध्ये करण्यात आले हाेते. प्रीटी बेबी (1978) आणि डॅमेज (1992) यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक माल्ले यांनी काेलकत्ता येथील आपल्या वास्तव्यात त्यांना दिसलेले या शहराचे भयानक चित्र डाॅक्युमेंटरीमध्ये रेखाटले हाेते.  समाजवादी व्यवस्थेचे काैतुक करून घेण्याची सवय असलेल्या इंदिरा गांधी त्यामुळे संतप्त झाल्या. त्यांनी ब्रिटीश परराष्ट्र मंत्रालयाकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी आम्ही बीबीसीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे 29 ऑगस्ट 1970 रोजी  इंदिरा गांधींच्या समाजवादी सरकारच्या आदेशाने बीबीसीला भारतातून हद्दपार करण्यात आले” नवी दिल्लीतील बीबीसी प्रतिनिधी, मार्क टुली आणि वार्ताहर रॉनी रॉबसन यांना पुढील १५ दिवसांत राजधानीतील बीबीसी कार्यालय बंद करण्याचे आदेश देण्यात आले.