पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक

चिंचवड विधानसेभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा पक्षाचा प्रयत्न आहे. असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. चिंचवड विधानसेभेच्या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज चिंचवडमध्ये भाजपने बैठक बोलवली होती. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीत चिंचवड पोटनिवडणुकीसाठीचा भाजपचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता होती. मात्र त्यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले उमेदवार ठरण्याची प्रक्रिया आज झाली नाही, कोअर कमिटीकडून पार्लमेंटरी बोर्ड यांच्याकडून केंद्रात निर्णय होत असतो. त्यामुळे दिल्लीतून उमेदवारी जाहीर होईल. भाजपची आजची बैठक ही उमेदवार निवडीसाठी नव्हती. तर या बैठकीत सांगोपांग चर्चा झाली की, इतर पक्षात काय चाललंय? आणि ते काय करणार आहेत? ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोणाशी कशी बोलणी करणं अपेक्षित आहे, याबाबींवर यात चर्चा झाली. त्याचबरोबर गेल्यावेळी कोणत्या बुथवर कमी मतं होती त्यात वाढ व्हावी यासाठी काय करता येईल? सरचिटणीस मुरलीधर मोहोळ दोन्ही शहरातील कार्यकर्त्यांसोबत संपर्कात राहतील. बैठकीत कामाची विभागणी करण्यात आली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. इथे पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीकडून कसबा आणि चिंचवड अशा दोनही जागेवर उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये चिंचवडच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही असल्याचे संकेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.