तुमच्या राजकारणामुळे काँग्रेसमधील संरचनात्मक त्रुटी उघड्या पडत आहेत. तुमच्यासारखा प्रदेशाध्यक्ष पक्षाला मातीत घालेल असे खुले पत्र काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लिहिले आहे. या कार्यकर्त्याने म्हटले आहे की काँग्रेस पक्षाचा एक तरूण कार्यकर्ता आपणाशी संवाद साधत आहे. क्षमा करा, मी माझे नाव आणि गाव न सांगताच आपणाशी बोलत आहे. नावावरून आणि गावावरून माझा जातधर्म, मी कुठल्या मतदारसंघातील आहे, माझ्यावर कुठल्या नेत्याचा प्रभाव आहे वगैरे निरर्थक गोष्टींचा अंदाज लावायची मोकळीक मला कुणाला द्यायची नाही. या निरर्थक गोष्टींना महत्व न देता थेट मुद्दयांवर आपणाशी संवाद व्हावा, असे मला वाटते. नानाभाऊ विषय असा आहे की आपण गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेस सारख्या एका प्रमुख राष्ट्रीय पक्षाचे आणि महाराष्ट्रासारख्या एका महत्वाच्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहात. आपल्या पक्षाचा राजकीय, सामाजिक इतिहास आणि विचारधारा तळागाळातील जनसामान्यांशी असणारा ऋणानुबंध आपणास परिचित आहे. आजपर्यंत अनेक चढ-उतार, जय-पराजय आले, परंतु काँग्रेसचे देशातील महत्व कधी कमी झाले नाही. काँग्रेस हा देशाचा आत्मा आहे. मात्र अलीकडच्या काळात धार्मिक मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या फॅसिस्ट शक्ती सत्तेत आल्यानंतर काँग्रेसमध्ये काही काळ नैराश्याचे वातावरण पसरले होते. काँग्रेसकडे तरुणांचा कल कमी झाला होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षात ५०% पदाधिकारी तरुणांमधून निवडण्याचे ठरवले. राहुलजींच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रे’मुळे पक्षात पुन्हा एकदा नवचैतन्य पसरले आहे आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे आकर्षित व्हायला सुरुवात झाली.
तुम्हाला तरुणांचे काय वावडे आहे ? असा प्रश्न करत या कार्यकर्त्याने म्हटले आहे की नव्या दमाचे तरुण काँग्रेसमध्ये येत असताना तुम्ही सत्यजित तांबे यांच्यासारख्या पक्षातील उमद्या तरुणांना बाहेरची वाट दाखवत आहात. तुमच्यामुळे पक्षाच्या संरचनेतील त्रुटी लोकांसमोर जाऊन राज्यात पक्षाची नाचक्की होत आहे याचे तरी भान बाळगा. पदवीधरच्या निवडणुकीत थेट पक्षाचे चिन्ह किंवा नाव वापरले जात नाही, त्यामुळे पक्षनिष्ठा वगैरे गोष्टींचा बागुलबुवा निदान इथे तरी तुम्ही उभे करू नका. उमेदवाराचे शिक्षण, वय, त्याला पदवीधरांच्या प्रश्नांची असणारी समज, त्यावर काम करायची तयारी, क्षमता, वक्तृत्व, कर्तृत्व, इत्यादि मेरीटवर सत्यजित तांबे तुम्हाला कमी वाटतात का ? पक्षात ज्येष्ठ असणारे डॉ.सुधीर तांबे स्वतः मागे राहून तरुण सत्यजित तांबेंना पुढे करत असतील तर तुम्हाला नेमकी अडचण काय आहे? एका बाजूला पक्ष तरुणांना संधी देण्याबाबत सकारात्मक विचार करत असताना तुम्हाला महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये तरुणांचा नेमका कुठला अडसर वाटत आहे ? पक्षासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या, पक्षाची ध्येयधोरणे, भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडणाऱ्या नव्या दमाच्या तरुणांकडूनच जर तुम्हाला असुरक्षितता वाटत असेल, तर तुम्ही राजकीयदृष्ट्या अपरिपक्व आहात असे म्हणावे लागेल. महाराष्ट्रासारख्या एका महत्वाच्या राज्यातील काँग्रेसला असा प्रदेशाध्यक्ष एक दिवस मातीत घालेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
