कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा वारसा आता गेला आहे. आता त्यांनी काँग्रेसचा वारसा घेतला आहे. उद्धव ठाकरे स्वतः मिंधे झाले आहेत, असा हल्लाबोल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. कोल्हापूर येथे बोलताना केसरकर म्हणाले, शक्तिप्रदर्शन करण्याशिवाय आता उद्धव ठाकरे काहीही करू शकत नाहीत. हिंदुत्वापासून दूर व्हा हे बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सांगितलं नाही. शिवसेना आणि भाजपची युती ही बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली आहे. ही युती तोडण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. मात्र उद्धव यांनी त्यांचा हिंदुत्वाचा वारसाच सोडला. त्यामुळे उद्धव ठाकरे उत्तराधिकारी कसे होऊ शकतात? आरोप करताना आदित्य ठाकरे यांनी संयम बाळगला पाहिजे. कारण ते स्वतःला आणि ठाकरे घराण्याला डॅमेज करत आहेत. ते त्यांनी थांबवावं, असा सल्ला केसरकर यांनी दिला.
