मुंबई : शिवसेनेतील उठावानंतर निवडणुकीतील समीकरणासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीचे युती केली खरी मात्र त्यामुळे शिवसेनेचीच अडचण होऊ लागली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रकाश आंबेडकर हे शरद पवार यांच्या राजकारणाचे कट्टर शत्रू मानले जातात. सध्याच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शरद पवार यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे दोन ध्रुवांवरील या विचारधारा जुळणार कशा हा युतीपूर्वीच प्रश्न केला जात होता. मात्र युती झाल्यावर पहिल्या दोन-तीन दिवसातच आंबेडकर यांनी जे बॉम्ब गोळे टाकले त्यामुळे महाविकास आघाडी राहते की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.
वास्तविक शिवसेनेपेक्षाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आंबेडकर यांची गरज अधिक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील 10 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेली होती. याशिवाय राज्यातील जवळपास 21 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयी आणि पराभूत उमेदवार यांच्या मतातील फरकाहून अधिक मतं मिळाली. त्यामुळे आंबेडकर आपल्या सोबत आले तर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्या आव्हानाशी मुकाबला करणे सोपे जाईल असे उद्धव ठाकरे यांना वाटत आहे. मात्र, यामध्ये एक गोष्ट दुर्लक्षित होतेय ती म्हणजे आंबेडकर यांना मिळालेली मते ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कट्टर विरोधी मते आहेत. त्यामुळे वंचित बहुजन विकास आघाडीचा पर्याय नसेल तर काँग्रेस राष्ट्रवादीला विरोधासाठी ही मते दुसरीकडे जाऊ शकतात. प्रकाश आंबेडकर यांनाही आपला यूएसपी माहित आहे. त्यामुळे आपली युती केवळ शिवसेनेचे आहे महाविकास आघाडीची नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना थेट अंगावर घेत भाजप बरोबरील जवळीकीचे आरोप केले आहेत.
एका बाजूला शरद पवार यांच्यावर तुटून पडताना आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. भारत जोडो यात्रेबाबतही त्यांची मते राहुल गांधींना अनुकूल नाहीत. युतीची घोषणा झाल्यानंतर आंबेडकर या पद्धतीने वक्तव्य करत आहेत. त्यावरून महाविकास आघाडीची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.
