मुंबई : तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठे आव्हान उभे केले असताना मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( केसीआर) यांनी राष्ट्रीय पातळीवर मोदी सरकारला आव्हान उभे करण्याच्या वल्गना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी बाजूला ठेवलेले स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजी राजे छत्रपती यांनी केसीआर यांची भेट घेऊन नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू केल्याची चर्चा आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतीच तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतल्याचे सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राव यांनी केवळ निवडणुकीपुरती आश्वासने न देता अथवा केवळ राजकीय दृष्टिकोन ठेवून कार्य न करता जनहित व राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून व्यापक कार्य आपल्या तेलंगाणा राज्यात केले आहे. गेल्या १४ वर्षांत तेलंगणा राज्यात विकासाची गंगा आणली आहे. त्यांचे कृषीधोरण, जनधोरण, सिंचन योजना, गरीब व वंचितांसाठी आखलेल्या विविध योजना व शिक्षण पद्धती या संपूर्ण देशासाठी मार्गदर्शन व आदर्शवत आहेत. राव हे केवळ आपल्या राज्यापुरते मर्यादित न राहता इतर राज्यांच्या विकासाचा व त्या माध्यमातून संपूर्ण राष्ट्राचा विकास साधण्याचा दूरगामी दृष्टिकोन ठेवणारे अत्यंत ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आहेत. केसीआर यांनी ५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात नांदेड येथे मेळाव्याचे नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांची भेट झाल्याची चर्चा आहे.
