सत्तेत असताना मुसलमानांची आठवण का येत नाही? इम्तियाज जलील यांचे शरद पवारांना खडे बोल

औरंगाबाद: विरोधात आल्यानंतर तुम्हाला मुसलमान का आठवतात. सत्तेत असताना तुम्हाला आठवण का येत नाही, असा सवाल करत स्वतःची वा वा करण्यासाठी ते बौद्धिक मुसलमानांची बैठक घेत असतील, तर ते योग्य नाही, असे खडे बोल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सुनावले आहेत. जलील म्हणाले, मला काहींनी सांगितलं होतं की, राष्ट्रवादीचे शरद पवार हे काही बौद्धिक मुसलमानांशी चर्चा करणार आहेत. पण किती वर्ष तुम्ही मुसलमानांचा रबर स्टॅम्प म्हणून वापर करणार? तुम्ही मुसलमानांना सत्तेत असताना का बोलावत नाहीत. ५० लोकांना बोलावत असाल तर मी पण येतो. मी बौद्धिक नाही. पण, लोकांमध्ये जाणारा आहे. मुसलमान लोकांची काय समस्या आहे, याची मला जाणीव आहे.

देशात वेगवेगळ्या प्रकारच्या आघाडी, युती झाल्या आहेत. आमच्याकडेही काही सरप्राईज पॅकेजेस असतील. इम्तियाज जलील हे या पक्षात जाणार. हा पक्ष जॉईन करणार, अशा चर्चा सुरू असतात. पण, एमआयएमचे ओवैसी यांनी मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. विचाराला घेऊन मी एमआयएम पक्ष जॉईन केला आहे.