मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. निरंकारी संत समागम कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आज संध्याकाळी एकनाथ शिंदे पुणे आणि मावळमध्ये असणार आहेत. तिथे पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरीमधील इंद्रायणी थडी जत्रेच्या समारोप समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. तर मावळातील देहूमधील संत तुकाराम महाराज मंदिरात आणि श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर दर्शनासाठी जाणार आहेत.
निरंकारी संत समागमाचे औरंगाबादेत 27 ते 29 जानेवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या आध्यात्मिक सोहळ्यात सुमारे तीन लाख भाविक सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा सोहळा एवढा भव्यदिव्य आहे की, यासाठी बिडकीन डीएमआयसीतील 300 एकर जागा त्यासाठी घेण्यात आली आहे. दरम्यान याच भव्यदिव्य सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या दौरा लक्षात घेता, पोलिसांकडून तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.
