सत्ता स्थापनेसाठी समाजवादी पार्टीच्या मांडीला मांडी, आता मुलायम सिंग वाटतात हिंदूहत्यारे

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठी उद्धव ठाकरे समाजवादी पार्टीच्या मांडीला मांडी लावून बसले होते. राज्यसभा निवडणुकीत अबू आझमी यांच्या नाकदुऱ्या काढल्या. मात्र मुलायम सिंग यादव यांना पद्मविभूषण दिल्यावर मात्र, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला ते हिंदूविरोधी असल्याचा साक्षात्कार झाला आहे.

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून टीका करण्यात आली आहे. कार सेवकांचे रक्त सांडणाऱ्या यादव यांना पुरस्कार का दिला असा सवाल करण्यात आला आहे. यावर भाजपच्या विचारात बदल हिंदूंच्या हत्याऱ्याचा पद्मविभूषणने गौरव केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

मुलायमसिंग यादव जर तुम्हाला हिंदूंचे हत्यारे वाटत होते तर महाविकास आघाडी सरकार बनवताना त्यांच्याच पक्षाच्या दोन आमदारांसोबत मांडीला मांडी लावून का बसला असा सवाल करण्यात येत आहे. राज्यात सत्ता स्थापनेच्या वेळी समाजवादी पक्षाच्या समोर शिवसेनेने लोटांगण घातले होते.  

राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही हे सरकार सेक्युलर आहे की हिंदुत्ववादी, हे आधी स्पष्ट करावं. तरच राज्यसभेला मतदान  करण्याची भूमिका स्पष्ट करू, असेही समाजवादी पार्टीने विचारले होते. आघाडीकडून सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देण्यात आल्यानंतर अखेर समाजावादी पार्टीने पाठिंबा दिला होता. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुलायम सिंग यादव यांचे पुत्र अखिलेश यादव यांनाही साकडे घातले होते. मात्र आता मोदी सरकारने मुलायम सिंग यादव यांच्या कार्याचा गौरव केल्याने शिवसेनेच्या पोटात दुखू लागले आहे.