आज मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरूवात झाली आहे. दादरच्या शिवाजी पार्कपासून ते कामगार मैदानापर्यंत मोर्चा असणार आहे. लव्ह जिहादबाबत सकल हिंदू समाजामार्फत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. दादरच्या शिवाजी पार्कमधून सकाळी १० वाजता या मोर्चाला सुरुवाती झाली आहे. या मोर्चासाठी मुंबईत दोन्ही ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथून मोर्चाला सुरुवात केली आहे. लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलेलं आहे, अशा काही पीडिताही या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. मोर्चात सहभागी झालेले नागरिक घोषणा देखील देत आहेत. या मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढताना दिसत आहे. या मोर्चाचे नेतृत्व महिला करत आहेत. मोठ्या संख्येनं महिला या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. हा मोर्चा पुढे प्रभादेवीपर्यंत काढण्यात येणार आहे. त्या ठिकाणी एक सभा देखील होणार आहे. जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा, गर्व से कहो हम हिंदू है अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येत आहे.
या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. प्रत्येक चौकाचोकात पोलिसांचा ताफा तैनात होता. अशा मोर्चांमध्ये जातीय तेढ निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेतली गेली.
