उद्धव ठाकरेंना झाले युतीचे ओझे

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये बऱ्याच दिवसांपासून युतीची चर्चा सुरू होती. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली, मात्र युतीच्या दोन दिवसानंतरच संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाक युद्ध झाल्याचे पाहायला मिळालं. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपचेच असल्याचे म्हटलं यावरून महाविकास आघाडीने वंचित कडे पाठ केल्याचे दिसलं. यावरून यांचं नीट जुळून येत नाहीये असं दिसते. प्रकाश आंबेडकर हे त्यांच अस्तित्व दाखवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत, आपले राजकारणात किती महत्त्व आहे हे ते नेहमी आपल्या कृतीतून दाखवत असतात.

उद्धव ठाकरे आपली गमावलेली पत परत मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, त्याच्यातूनच ते आपलं राजकीय कौशल्य दाखवण्याचा देखील प्रयत्न करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंची सध्याची परिस्थिती पाहता ते कुणावरही काही भाष्य करताना दिसत नाहीत. संजय राऊतांच्या तोंडून जेवढे काही बोलतात बस तेवढेच ते बोलताना दिसतात. उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकर नाराज होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेताना दिसत आहेत. वंचित सोबतची युती त्यांना काहीही करून टिकवायचे आहे. उद्धव ठाकरे सध्या दोन दगडांवर पाय ठेवून डगमगत उभे आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर युती नावाच्या भुताने उद्धव ठाकरेंना झपाटले आहे. चाळीस आमदार सोडून गेले नाही त्यांना दुसरा कुठला पर्यायही नाही.

उद्धव ठाकरे म्हणत असतील की, आम्ही पुन्हा लढू इतक्या जागा जिंकून आणू अमुक करू तमुक करू. ते म्हणतात जागा जिंकू पण या 40 जागा कशाच्या बळावर जिंकणार आहेत हे सांगायला ते तयार होत नाहीयत. ठाकरे गटाकडे सध्या नेते व कार्यकर्ते उरल्याचे दिसत नाही. चाळीस आमदार गेल्याने त्यांच्या गटात मोठा खड्डा पडला हाच खड्डा बुजवण्यासाठी व आपले अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे धडपडताना दिसतात यासाठीच त्यांना युतीचा आसरा पाहिजे.

एकीकडे आंबेडकरांची युती तर दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. हे युतीचे ओझे होते, ठाकरेंच्या मानगुटीवर बसले आहे. त्यांना शरद पवारांनाही नाराज करता येत नाही आणि प्रकाश आंबेडकरांनाही त्यांच्यासाठी इकडे आड तर तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे त्यांना दोन दगडांवर पाय ठेवून कसरत करावी लागत आहे. आंबेडकर स्वतःचा प्रभाव ठेवण्यासाठी प्रयत्न करतात कोणी दुखावलं किंवा युती झाली नाही किंवा झाली तर ती टिकली नाही याचा आंबेडकरांना काही फरक पडत नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना युतीची गरज असल्याचं त्यांनी जानल आहे त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार यांच्यावर निशाणा साधत आहेत. जसे आंबेडकरांना युतीचा काही फरक पडत नाही तसेच शरद पवार यांनाही या गोष्टीचा काही फरक पडत नाही त्यांनाही आंबेडकरांचे देणे-घेणे नाही. ते ही टीकेला टीकेने उत्तर देताना दिसतात. उद्धव ठाकरेंना पक्षात फुट पडल्याने स्वबळावर लढू असे म्हणण्याची हिंमत दाखवता येत नाही तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करताना दिसत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर युतीचे ओझे आता जड झाल्याचे दिसत आहे.