राज्यात मविआ लोकसभेच्या ३४ जागा कोणत्या आधारावर जिंकणार

इंडिया टुडे सी व्होटरचा नुकताच एक सर्वे जाहीर झालाय. बहुतांश मुद्यांना विचारत घेऊन तो बनवण्यात आलाय. जसे की एनडीए आणि युपीए ला किती जागा मिळू शकतील? याचा त्यात उल्लेख आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाला किती जागा मिळतील. वेगवेगळ्या पक्षाची राज्यात कशी स्थिती राहील. कोणत्या मुद्यांवर कोणत्या पक्षाची जनमानसात लोकप्रियता आहे. लोकांचे त्या संदर्भात काय मत आहे, असे अनेक मुद्दे आहेत. मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे म्हटले आहे. सर्वेक्षणात एनडीएला २९८ जागा तर युपीएला १५३ जागा मिळतील असा अंदाज बांधण्यात आलेला आहे. काँग्रेस पक्षाला ६८ जागा तर भाजपला २८४ जागा मिळू शकतील अशी शक्यता दाखवली आहे. महाराष्ट्रातील निकाल अगदी उलट लागण्याचे सर्व्हेत म्हटलं गेले आहे. भाजपला १४ आणि मविआला ३४ जागा मिळतील असे त्यात नमूद करण्यात आले. या अंदाजाचे आपण तथ्य पाहण्याच्या विचार केला तर तो न पटणारा असाच आहे.

सद्यास्थितीत राज्यातील राजकारणाची चिकित्सा करायची म्हटल्यावर आपल्या एक बाब लक्षात येईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागील दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीतील स्थिती ही चिंताजनक राहिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आजवर पर्यंत दोन अंकी संख्या लोकसभेच्या निवडणुकीत गाठता आलेली नाहीये. जर यांना ३४ जागा निवडून आणायच्या असतील तर दोन पक्षाला प्रत्येकी ११ आणि एक पक्षाला १२ जागा निवडून आणाव्या लागतील. काँग्रेसचे तर मागील निवडणुकात एक किंवा दोन खासदार निवडून येतायेत. त्यामुळे केंद्रात भाजप सत्तेत येत असताना राज्यात मविआची लॉटरी लागणार हे आश्चर्यकारक असे वाटते. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे तर ४० आमदार आणि १३ खासदार पक्ष सोडून गेले तरी त्यांचे १८ खासदार निवडून येईल असा दावा सर्व्हेत केलेला आहे. मात्र, असे काही अपरित घडले असे चिकित्सा करायची म्हटल्यावर वाटत नाही. या घडीला शिवसेना ठाकरे गटाचे १८ खासदार निवडून येईल, ज्या पक्षातून सरपंचापासून, खासदारापर्यंत सर्वच पक्ष सोडून जातायेत इथे अशी कोणती क्रांती होईल म्हणून वाटतं नाही. त्यामुळेच ह्या आकड्या मागील तर्क आणि तथ्य लक्षात येत नाही.

उद्धव ठाकरेंनी मविआला ४० जागा मिळतील तर संजय राऊतांनी ४० पेक्षा अधिक जागा जिंकणारच असा अतिआत्मविश्वास सर्व्हेक्षण प्रकाशित झाल्यावर दाखवला. त्यामुळे महाविकास आघाडी सर्वेक्षणानंतर खुश असल्याचे दिसते. गुलाबराव पाटील यांनी एका सर्वेक्षणात मी निवडणूक हरणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र, त्या निवडणुकीत मी बहुमताने निवडून आलो होतो असे सांगितले आहे. त्यामुळे सर्वेक्षण प्रत्येक वेळी बरोबर ठरेलच असे नाही. मागील ग्रामपंचायत, राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुका पाहता भाजपने बाजी मारल्याची पाहायला मिळाली आहे. ठाकरे गटाला तर शिंदे गटापेक्षा कमी जागा मिळायचे आपण पाहिले.या निवडणुकीत भाजपने अतिरिक्त उमेदवार देऊन तो निवडून आणला आणि स्वतःचा वरचष्मा दाखवला. त्यामुळे आधीचे रिकॉर्ड आणि सध्याची वस्तुस्थिती पाहता असे काही होईल असे वाटत नाही, त्यामुळे हे सर्वेक्षण बघून धक्का बसतो.

मविआ सरकारवर कोरोना काळात एवढे भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले, इतर काही आरोपाखाली त्यांचे काही मंत्री नेते तुरुंगात जाऊन आले. मविआच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वेळोवेळी उपस्थित झाला होता. सध्याची वास्तविकता पाहता मविआतील घटक पक्षांना वाटते ४० जागा जिंकू पण सध्याला वंचितमुळे उद्धव ठाकरे कोंडीत सापडले आहे. संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचे मागील काही दिवसातील वक्तव्य पाहता यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत नाही, मतभिन्नता असल्याचे दिसून येते. अशातच यांचा प्रचाराचा चेहरा कोण असणार आहे.