विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी आज (साेमवार) मतदानाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. नाशिक अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद नागपूर आणि काेकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदार आपला हक्क बजावत आहेत. येत्या दाेन फेब्रुवारीला मतमाेजणी हाेणार असून यंदाच्या निवडणुकीत काेण जिंकले ते त्यादिवशी स्पष्ट हाेणार आहे.
यंदा नागपूर आणि नाशिक विधान परिषदेच्या जागेकडे सर्व राज्याचं लक्ष लगालं आहे. पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरून नाशिकमध्ये राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. नाशिकमध्ये काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र हातात एबी फॉर्म असूनही सुधीर तांबे यांनी फॉर्म भरला नाही, तर दुसरीकडे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दखल केली. यावरून काँग्रेस नेतृत्व नाराज झालं, पक्षादेश डावलल्यानं सुधीर तांबे यांच्यावर कारवाई करण्यात आली, तर महाविकास आघाडीने सत्यजित तांबे यांना पाठिंबा न देता अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या अडचणी वाढल्या होत्या.
एकीकडे महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांनी जोरदार प्रचार केला असून दुसरीकडे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियासह मतदारांशी जनसंपर्क वाढविला आहे. त्यामुळे दुसरीकडे मतदारांची उदासीनता आणि उमेदवारांचा असलेला जोश नेमकी नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत काय रंग उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
