शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण कोणाचा या संदर्भात निवडणूक आयोगात ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. आज दोन्ही गट लेखी स्वरुपात आपले मुद्दे निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत. चिन्हाच्या निर्णयाबाबत दोन शक्यता आहेत. आज धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे. आज लेखी म्हणण मांडल्यानंतर चिन्हाबाबतचा निर्णय राखून ठेवला जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस शिंदे आणि ठाकरे गटासाठी महत्त्वाचा आहे.
23 जानेवारीपासून 30 जानेवारीपर्यंत रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले होते. लेखी उत्तरं मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी तर शिंदे गटाच्या वतीनं महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद करत आहेत.
निवडणूक आयोगाच्या समोर शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी केलेला युक्तिवाद बघता धनुष्यबाण चिन्ह कुणाला याबाबत स्पष्टता येत नाही. निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत तारीख पे तारीख सुरू आहे. दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे संख्याबळ बघता दोन्ही गटाने धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा केला आहे.
