पुण्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी ; भाजपची प्रतीक्षा

पुण्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी तयारी महाविकास आघाडीत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झालेली नसली तरी स्थानिक पातळीवर मात्र कुरघोड्या सुरू झाल्या आहेत.

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पुण्यातील कसबा विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीवरून आता महाविकास आघाडीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून कसबा विधानसभा मतदारसंघावर दावा सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते बालासाहेब धाबेकर यांनी या विधानसभेच्या जागेवर दावा केला असून, त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना नाश्ता करण्यासाठी घरी बोलावत शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली आहे.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नावाची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल करून टाकली. त्यानंतर काँग्रेसचे इच्छुक बाळासाहेब दाभेकर यांनी महाविकास आघाडीतील काही पदाधिकाऱ्यांना सकाळी नाश्त्यासाठी बोलावले. त्यांचा आपल्याच पाठिंबा असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांची भावना जाणून घेण्यासाठी मंगळवारी बैठक बोलावली आहे. दुसरीकडे भाजपमध्ये उमेदवारी कोणाला जाहीर होणार याची प्रतिक्षा आहे.

दरम्यान दुसरीकडे कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाकडून देखील कसबा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र पक्षादेश अंतिम असेल त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचं टिळक यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं आहे.