नाशिक : आख्खे सरकार मला जेलमध्ये टाकण्याच्या मागे लागले होते. पण हे काहीच करू शकले नाही. मला जेलमध्ये टाकण्याची जबाबदारी यांनी ज्याच्यावर टाकली ते जेलमध्ये गेले, पण मी जेलमध्ये गेलो नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
नाशिक येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राकरता केलेली एक तरी सांगण्यासारखी गोष्ट आहे का? एक प्रकल्प दाखवा. एक प्रोजेक्ट दाखवा. एक रस्ता दाखवा. एक मेट्रोची व्यवस्था दाखवा. शेतीकरता घेतलेला एक निर्णय दाखवा. एकही निर्णय नाही. अडीच वर्षे खुर्च्या तोडण्याचे काम केले. त्याचसोबत भ्रष्टाचाराची बजबजपुरी आपण बघितली. त्यांना भीती होती की आपले तीन पायांचे ऑटो रिक्षा सरकार केव्हा गडगडेल हे माहिती नाही. त्यामुळे त्यांनी भ्रष्टाचाराची टी-ट्वेन्टी खेळली. रोज केवळ भ्रष्टाचार. इतका भ्रष्टाचार या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. केवळ भ्रष्टाचार नव्हता. त्या सोबत अनाचार होता. दुराचार होता, दुर्व्यवहार होता.
फडणवीस म्हणाले, सरकार आल्यानंतर केवळ सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपल्या सरकारने दहा हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. नियमित कर्ज भरतात त्यांना पन्नास हजार रुपये देऊ, असे मविआ सरकारने सांगितले होते पण एक नवा पैसा दिला नाही. तीन-तीनदा त्याच घोषणा केल्या. टाळ्या वाजवून घेतल्या पण फुटकी कवडी दिली नाही. ते पैसा आज आपण देत आहोत. ज्यांनी नियमित कर्ज भरले त्यांना पन्नास हजार रुपये देण्याचे काम आपल्या सरकारच्या माध्यमातून चालू आहे.
आज आपण नाशिक विरुद्ध मराठवाडा असा वाद सुरु होताना बघतो. कारण गोदावरीचे खोरे तुटीचे आहे. आपण दोन भाऊच एकमेकांशी भांडतो. पण त्याचवेळी पश्चिमी वाहिन्यांचे पाणी समुद्रात वाहून जाते. मी मुख्यमंत्री असताना २०१७ साली आपण याचा अभ्यास केला. अहवाल तयार केला. जलमंडलाची मान्यता घेतली. त्या संदर्भातला जीआर काढला. आपले सरकार गेले. अडीच वर्षात फाईलवरची धुळदेखील मविआ सरकारने झटकली नाही. त्यांना संधी होती. हे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणण्याची. पुन्हा सरकार आल्यानंतर आपण ते काम हाती घेतले. आपला प्रयत्न आहे की याच वर्षी टेंडर काढून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणायचे आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा, असेही फडणवीस म्हणाले.
