नाराची दूर झाली का या प्रश्नावर मोहन बाळगून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे टेन्शन वाढविले आहे. मल्लिकार्जुव खरगे याच्यासोबत बसून चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करून निवडूनही आले. त्यामुळे काँग्रेसमध्ये भूकंप झाला आहे. नाशिक मतदारसंघात झालेल्या घोळाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरले जात आहे. याबाबत बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले मागील अनेक दिवसांपासून मी माध्यमांसमोर आलेलो नाही. माझा राजीनामा हा काँग्रेसची अंतर्गत बाब आहे.
माध्यमांनी त्याला खूप मोठं केलं आज माझी आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी मला काँग्रेसच्या रायपूरमधील अधिवेशनाला यावे असा आग्रह केला आहे. मी या अधिवेशनाला जाणार आहे. प्रत्येक संघटनेत अनेक प्रश्न असतात. तसेच आमच्याही संघटनेत आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर अध्यक्ष मल्लिकार्जुव खरगे याच्यासोबत बसून चर्चा करावी असे मत एच के पाटील यांचे आहे. त्यामुळे चर्चा होईल. काही मुद्दे आहेत, त्यावर चर्चा होईल. हे सर्व प्रश्न काँग्रेसच्या बळकटीकरणासाठीच आहेत असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
