सेवालाल महाराजांची महिमा ; जे पैसे देत नव्हते त्यांना घरी बसवले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पवित्र उमरी व पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी आहे. या ठिकाणी विकासासाठी मागच्या काळात आपण या काम सुरु केले. तुम्ही पण मधली अडीच वर्षे फुटकी कवडी देखील मिळाली नाही. पण सेवालाल महाराजांची महिमा बघा. जे पैसे देत नव्हते त्यांना घरी बसवले आणि जे पैसे देत आहेत त्यांना शिंदेजींच्या नेतृत्वात पुन्हा या ठिकाणी आणले, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.उमरी व पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशिम) येथील ५९३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

यावेळी गोर बंजारा समाजाचे धर्मगुरू बापूसिंग महाराज, महंत जितेंद्र महाराज, यशवंत महाराज, कबिरदास महाराज, रायसिंग महाराज, शेखर महाराज, जुगनू महाराज, दिलीप महाराज यांच्यासह मंत्री संजय राठोडज, गिरीश महाजन, दादाज भुसे, खासदार भावना गवळी, प्रतापराव जाधव, आमदार निलय नाईक, डॉ. तुषार राठोड, इंद्रनील नाईक, राजेंद्र पाटणी, किरण सरनाईक आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले अडीच वर्षे तुम्हाला फुटकी कवडी देखील मिळाली नाही.आता पैशांची कमतरता पडू देणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी मला तिजोरीची चावी दिली आणि मला सांगितले, तुम्हाला अर्थमंत्री केले आहे. ही तिजोरी बंजारा समाजाकरता उघडून टाका.५३७ कोटी रुपयांचा आराखडा आपण तयार केला.आता काम थांबू देणार नाही. नंगारा भवन, मंदिराच्या आजुबाजुचा विकास, रामराव बापूंच्या समाधीचा विकास करण्यात येईल.

सेवालाल महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आल्यावर काशीला आल्यासारखे वाटते कारण ही बंजारा समाजाची काशी आहे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले, ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीला काशी विश्वनाथाला नवीन स्वरूप दिले, काशीचा कायापालट केला तसेच आम्ही सगळे मिळून या बंजारा काशीचा देखील कायापालट करणार आहोत. सेवालाल महाराज हे लढवय्ये होते. जेव्हा समाजावर आक्रमण झाले तेव्हा त्यांनी आपल्याला लढायला शिकवले. त्याचवेळी शांतीचा संदेशही त्यांनी दिला.सेवालाल महाराजांनी ज्या प्रतिज्ञा दिल्या त्याच्यामध्ये निसर्गाला पूरक नैसर्गिक जीवन जगा. कोणताही भेदभाव करू नका. सन्मानाने आयुष्य जगा. खोटे बोलू नका. प्रामाणिक राहा. इतरांचे सामान चोरू नका. भुकेल्यांना अन्न द्या. गरजू लोकांना मदत द्या. इतरांना इजा करू नका. निर्भयपणे जगा. धैर्यवान व्हा आणि आत्मविश्वासाने जगा, या स्वरुपाच्या २२ प्रतिज्ञा सेवालाल महाराजांनी आपल्याला दिल्या. या प्रतिज्ञा केवळ बंजारा समाजाकरता नाहीत तर संपूर्ण विश्वाकरता आहेत. पंतप्रधानांनी जी-ट्वेंटी च्या माध्यमातून ‘वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर’ अशी घोषणा दिली. या घोषणा म्हणजे सेवालाल महाराजांनी आपल्याला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा आहेत, ज्या आज जग स्विकारते आहे. या बावीस प्रतिज्ञांचे अनुकरण केल्यानेच जगाचे भले होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बंजारा तांडा विकासाचा आराखडा सरकार हाती घेईल. प्रत्येक तांड्यापर्यंत आम्ही विकास पोहचवून दाखवू. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून सांगितले आहे भटक्या विमुक्त, ओबीसी, व्हीजेएनटी समाजातल्या आमच्या कोणत्याही मुलामुलींना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येता कामा नये. तुम्ही काळजी करू नका. त्या संदर्भातल्या योजना तयार करून बंजारा मुलामुलींना शिक्षण घेता आले पाहिजे, त्यांच्या निवासाची सोय झाली पाहिजे, याकडे सरकार योग्य लक्ष देईल. मोठे परिवर्तन येत्या काळात तुम्हाला दिसेल नॉन क्रीमी लेयर लावू नका अशी मागणी केली आहे ती योग्य आहे. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले की ही मागणी तपासून घ्या कायद्यात बसत असेल तर निश्चितपणे निर्णय घेऊ या संदर्भात महाधिवक्त्यांचे अभिमत मागवू असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.