काँग्रेसचा राष्ट्रवादीला धक्का; 91 जणांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

महाविकास आघाडीतील घटक पक्षात कुरघोडी सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेले हे आऊट गोईंग राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. परिणामी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपुर्वी माजी राज्यमंत्री विजयबाप्पू शिवतारे यांच्या नेतृत्वात बारामती लोकसभा इंदापूर तालुका, करमाळा सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटातील असंख्य पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुण्याच्या भोर तालुक्यात भावेखल येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थित आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्त्यांसह 91 जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश करण्याऱ्यांमध्ये बहुतांश जण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.

पुढील काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये झालेलं हे इनकमिंग पक्षाच बळ वाढवणारं ठरणार आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी जोरदार तयारी केल्याचे पहायला मिळतंय. महाविकास आघाडी या निवडणुका एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरु असताना अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याचे दिसत आहे.