पहाटेचा शपथविधी अन‌् ग्रेट अ‍ॅक्टर शरद पवार

अजित पवार यांच्यासाेबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीची माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हाेती असा गाैप्यस्फाेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या काळातील शरद पवार यांची वक्तव्ये आठवून आपली फसवणूक झाल्याची चर्चा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्येच सुरू झाली आहे. ग्रेट अ‍ॅक्टर शरद पवार असेही म्हटले जात आहे. यावेळीचा सर्व घटनाक्रम आठवला जाऊ लागला आहे.

24 नाेव्हेंबर 2019 राेजी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर काही वेळातच सुप्रिया सुळे यांची भावनिक पाेस्ट लिहित पक्ष फुटला आणि घरही फुटले असे ट्विट केले. अजित पवारांना परत येण्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले.

शरद पवार यांनी सकाळी 9 वाजून 26 मिनिटांनी एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की अजित पवार यांच्या राजकीय निर्णयला राष्ट्रवादी काॅंग्रेसचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असे त्यात म्हटले. त्यानंतर अजित पवारांनी ट्विट केले. आपण अद्याप राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहेत आणि शरद पवार हेच आपले नेते आहेत. असे ते म्हणाले. यावर शरद पवारांनी लगेच ट्विटरद्वारे उत्तर दिले. भाजपासाेबत जाण्याचा प्रश्नच उद‌्भवत नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेसने शिवसेना आणि काॅग्रेससाेबत हातमिळवणी करून सरकार स्थापन करण्याचे ठरविले आहे. अजित पवार यांचे विधान खोटे दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले अजित पवार फुटून जातील असं वाटलं नव्हतं. सकाळच्या शपथविधीसाठी दहा ते अकरा आमदार आम्हाला फोटोत दिसले. तीनजण या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत. आणखी काही आमदार परत येत आहेत.

अजित पवारांच्या बंडाबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत म्हटले हाेते की शपथविधी झाल्यानंतर मला सकाळी 6 वाजता फोन आला. मला सुप्रियाने सांगितलं अजितने शपथ घेतली आहे. या गोष्टीवर माझा विश्वासच बसला नाही. सुप्रिया चांगलीच चिडलेली होती. मला तिने हे सांगितल्यावर मी लगेचच टीव्ही लावला. शपथविधीची दृश्यं पाहत असतानाच मला अजितसोबत राष्ट्रवादीचे जे लोक दिसले ते सगळेच माझ्या विश्वासातले होते. मला कळून चुकलं या सगळ्यांना माझं नाव सांगूनच तिथे नेण्यात आलं असावं .ही गोष्ट उमगल्यानंतर माझी खात्री झाली की मी अजितचं हे बंड मोडून काढू शकतो. मी लगेचच उद्धव ठाकरेंना फोन केला आणि ही स्थिती निवळेल असा विश्वास त्यांना दिला. त्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट केली. गेल्या तीन वर्षांपासून शरद पवार याबाबत सातत्याने खाेटे सांगत आहेत, असेही आता कार्यकर्त्यांना वाटत आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी हाेती असे म्हटले हाेते. त्यावर चर्चा सुरू झाल्यावर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला हाेता. यावेळी ते म्हणाले हाेते आता याला दोन वर्ष झाली आहेत. कशाला तो विषय करता. शरद पवारांना हा विषय का टाळायचा आहे हे आता समजले असेही बाेलले जात आहे.