ठाकरे गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत हे उध्दव ठाकरे यांचे की शरद पवार यांचे असा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच विचारला जाताे. ‘चाेरमंडळ’ या विधानावरून अडचणीत असलेल्या राऊत यांच्या मदतीला त्यांचा ‘आपला माणूस’ असलेले शरद पवार हेच धावून आले आहेत. विधीमंडळाला चाेरमंडळ म्हटल्याने संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाचा ठराव मांडला गेला आहे. विधानसभेत यावर महाविकास आघाडीतील काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी साेडाच पण शिवसेनेच्या नेत्यांनीही त्यांची बाजू घेतली नाही अजित पवार, नाना पटाेले यांच्यासह ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनीही संजय राऊत यांचे विधान याेग्य नसल्याचे मत व्यक्त केले हाेते. मात्र संजय राऊत यांच्या मदतीला शरद पवार धावून आले आहेत. त्यांनी राऊत यांच्या विधानाची पाठराखण केली आहे.
राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ‘ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लीकेट, चोरांचं मंडळ, चोरमंडळ, हे विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे.’ हे विधान केले. यावर विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याबद्दल हक्कभंग प्रस्ताव मांडला गेला आहे. तसेच गठीत केलेल्या समितीत ठाकरे गटातील आमदारांचा समावेश नाही. हे योग्य नाही. संजय राऊत यांचे विधान ऐकले असता त्यांच्या म्हणण्याचा रोख दिसून येतो असे शरद पवार म्हणाले आहेत.खासदार संजय राऊत यांचे हे विधान मूलत: विशिष्ट गटाविषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे. संजय राऊत यांनी जे विधान केले त्या विधानाचा विग्रह न करता ते एकत्रितरित्या वाचले अथवा ऐकले असता विधानाचा अन्वयार्थ स्पष्ट होतो असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.एका बाजुला महाविकास आघाडीतील नेते राऊत यांच्या भूमिकेपासून स्वत:ला दूर ठेवत असताना आघाडीचे सर्वेसर्वाे असलेले शरद पवार यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे राऊत यांचा खराखुरा ‘आपला माणूस‘ त्यांच्या मदतीला धावून आला अशी चर्चा सुरू आहे.
