मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराेधी आमदारांना देशद्राेही म्हटल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की टेरर फंडींगला मदत करणा-या नवाब मलिकला मी देशद्रोही म्हटलं होतं. देशद्रोह्याविरोधात बोलणं गुन्हा असेल तर तो मी १०० वेळा करेन. याचे कारण म्हणजे मलिक यांनी थेट अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या गॅंगशी संगनमत करून मालमत्ता खरेदी केल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले हाेते.
नवाब मलिकला मुख्यमंत्री देशद्राेही का म्हणत आहेत? त्याचे कारण म्हणजे मलिक यांना अडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँड्रिंगशी संबधित प्रकरणात ईडीने (सक्तवसुली संचालनालय) अटक केलेली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या एफआयआरच्याआधारे सुरू तपासाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. दाऊदचा भाचा अलिशाह पारकर व छोटा शकीलचा माणूस सलीम फ्रुटच्या जबानीनुसार मलिक यांना अटक करण्यात आली आहे.लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला काश्मिरातील कारवायांसाठी आर्थिक पुरवठा करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएने दाऊदविरुद्ध बेकायदेशीर कृत्यविरोधी कायद्यानुसार (यूएपीए) गुन्हा दाखल केला हाेता. या गुन्ह्यासाठीचा पैसा हवालामार्फत मुंबईतून दाऊदपर्यंत किंवा दाऊदच्या सांगण्यावरुन मुंबईतून काश्मिरला पुरवला जात असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले हाेते.
दाऊदची बहिण हसिना पारकरच्या बंद घरावर तसेच मुंबई व ठाण्यात मिळून दहा ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. त्याअंतर्गतच अलिशाह पारकर याची चौकशीही ईडीने केली होती. मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित काही मालमत्ता कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप ‘ईडी’ने मलिक यांच्यावर ठेवला आहे.कुर्ल्यामध्ये गोवावाला कंपाऊंड ही मालमत्ता हसीना पारकरच्या मालकीची आहे. ईडीच्या तपासात असे निष्पन्न झाले की, ही मालमत्ता वारसा हक्काप्रमाणे मरियम आणि मुनिरा प्लंबर यांच्या मालकीची होती. ती मालमत्ता नवाब मलिक यांच्या मालकीच्या कंपनीने दाऊदच्या डी-गॅंगच्या लोकांशी संगनमत करून विकत घेतली.
