बेळगावबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी केली दिलगिरी व्यक्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केला आहे. या वक्तव्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने अमोल कोल्हेंवर टीका केली आहे. तसेच, सीमाभागातून अमोल कोल्हेंबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यानंतर अमोल कोल्हेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्याकडून अनावधानाने बेळगावचा उल्लेख बेळगावी असा झाला असं स्पष्टीकरण कोल्हेंनी दिलं आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, “येत्या पाच तारखेला बेळगावच्या राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे, असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे या कार्यक्रमाला येत होतो. पण, निपाणीमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याला जात असताना, घाईत या कार्यक्रमाबद्दल बोलताना बेळगावचा माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला. याबाबत मराठी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील. त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.” यासंबधीचा एक व्हिडिओ खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरती शेअर केला आहे. “येत्या पाच तारखेला बेळगावच्या राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे, असं मला सांगण्यात आलं आहे, म्हणून या कार्यक्रमाला मी येत होतो, परंतु या कार्यक्रमाच्या संदर्भात आता निपाणीमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याला जात असताना घाईमध्ये, बेळगावचा माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला याबद्दल मराठी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील त्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. माझी काय भूमिका आहे ते आजतागायत सर्वांना माहिती आहे. मी आजही त्या भूमिकेवर ठाम आहे.”

पुढे ते म्हणतात की, मी माझ्या सीमाभागातील बांधवांबरोबर ठामपणे उभा आहे. त्यांच्या विनंतीवरून त्यांच्या आग्रही मागणीवरून 5 तारखेचा बेळगाव मधल्या राजहंस गडावरच्या माझा येण्याचा कार्यक्रम मी रद्द करतो. या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाही. तुमच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्याबरोबरच मी ठामपणे उभा आहे. त्याविषयी विश्वास बाळगा असं त्यांनी म्हंटलं आहे.