तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर पोराला मंत्री करायला नको होतं – संजय जाधव

काही महिन्यापूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. तसेच बहुमताच्या जोरावर शिंदे गटाला शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का होता. सत्ताधाऱ्यांकडून शिवसेनेत घडलेल्या राजकीय घडामोडींना उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. अशातच परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी देखील या परिस्थितीला उद्धव ठाकरेंना जबाबदार धरत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होते. त्यांनी कुणाकडे तरी पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे होते असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केलं आहे.दोघंही मंत्री झाल्याने पक्ष संघटनेकडे लक्ष देता आले नाही आणि गद्दारांना संधी मिळाली. तुम्ही खुर्ची आटवल्याने त्यांना वाटलं की, उद्या बाप गेल्यावर पोरगं माझ्या बोकांडी बसेल. त्याच्यापेक्षा वेगळी चुल मांडली, तर काय बिघडलं? आणि याच भूमिकेतून ही गद्दारी झाली.