संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लेखोरांचा ठाण्यात मनसे स्टाईलने शोध

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला होता. त्याचे सीसीटीव्ही समोर आले होते. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी दोन जण ठाण्यातील असल्याचा निष्पन्न झाले आहे. यामुळे ठाणे येथील लक्ष्मी चिराग नगर येथे मनसेचे कार्यकर्ते पोहचले. या ठिकाणी दोन हल्लेखोर वास्तव्य करत असल्याची माहिती ठाण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. आरोपींना शोधण्यासाठी ठाण्यातील मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी लक्ष्मीनगरात शोध सुरु केला.

संशयित आरोपीच्या एका महिला नातेवाईकासोबत मनसे कार्यकर्त्यांचा चांगलाच वाद झाला. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मनसे कार्यकर्त्यांना पांगवण्यास सुरुवात केली. सध्या स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आला. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडेंवर झालेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. अशोक खरात आणि किशन सोळंकी अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. त्यातील अशोक खरात नावाचा आरोपी हा माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असल्याचं समोर आले आहे. शनिवारी सकाळी त्याला भांडुपमधून पोलिसांनी ताब्यात घेतले.

संदीप देशपांडे यांनी पोलिसांच्या जबाबात, ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई आणि संजय राऊतांचं नाव घेतलंय. याच अशोक खरातचे वरुण सरदेसाईंसोबतचे फोटोही व्हायरल झालेत. काही फोटो हे संजय राऊतांचे भाऊ, सुनिल राऊतांसोबतही आहेत. हेच फोटो देशपांडेंनीही पत्रकार परिषदेत दाखवले. कोरोनाच्या काळातील मुंबई महापालिकेतले घोटाळे बाहेर काढत असल्यानंच हल्ला झाल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला आहे.